Tomorrow’s Poetry — An Experiment in Marathi

Tomorrow’s Poetry — An Experiment in Marathi

By

/

1–2 minutes

read

मृत्यूहीनत्वाचे जीवन आविष्कार अग्नीचा लखलखीत,

शुभ घेई प्रखर देहरूप चैतन्याच्या अनिर्बंध संकल्पनेत;

पहा, येती नाना पक्षी गात गात, जसे येती शब्द विहंगत,

आणिला त्यांनी गुणगुणाट निर्झराचा वाहत्या काव्यात.

आनंदाच्या पंखांची झंजुमुंजु वेळी आली परदेशातुनि न्यारी हंसांची अचंबित झुंडच्याझुंड,

आणि भरला प्रकटीकरणाच्या घाईने अमर्याद शून्याचा आत्मा, उकलुनी त्यातले रहस्य.

काळ नव्हे, थोर अलौकिक प्रकाशमय मृत्यूने आपल्याला पुढच्या मार्गाने ऊज्वलतेकडे न्यावे. त्यात प्रकृतिधर्म आणि देहाची पार्थिवता चैतन्याला इच्छित असलेले स्वरूप घेतील. तेंव्हा एक देह मृत न होता दुसरा देह घेईल. उद्याचे आत्मज्ञान आणि काव्य हे अजमावून सांगेल. उदात्त आवाज आणि ओघ हे भारदस्त काव्याचे तेच वाङ्मयिन वैशिष्ट्य उंचावणारे प्रतिष्ठित वैभव ठरते. त्यात तीव्र उत्साह आणि धावता शब्दप्रवाह एकाच ठिकाणी येतात. ते जोरकस रीतीने यावे हे भाषेच्या क्रियाशीलतेकरिता आवश्यक आहे.

वेद आणि उपनिषदांच्या प्राचीन ऋषी-कवींनी मंत्र उच्चारण केले ते सर्वात अंतरंग आणि जवळजवळ गुप्त सत्य आहे ते पाहण्यासाठी. तिथे अंतर्ज्ञानी आणि प्रकटीकरणात्मक प्रेरणा मूर्त रूप घेते. ती एक सर्वोच्च लयबद्ध भाषा आहे. ती बनवलेली नव्हे अवतरलेली भाषा आहे, तिच्या अलंकारासहीत, तिच्या प्रगल्भ शब्दकोशातून, छंदशास्त्रातून, मूळ उद्गारासह.

खरे म्हणजे, अध्यात्म आता खूप पुढे गेलेले आहे, नव्या प्रखर चिद्विलासाच्या क्षमतेत, सामर्थ्यात, अग्नीच्या तेजाने दिव्य क्रियाशील शक्तीच्या विलासात, कार्यसिद्धीत, त्या उच्चतम प्रकृतीच्या समृद्धीत, त्या आविष्कारात. आशावादी दृष्टिकोनातून भविष्याच्या उज्वलतेतुन सांगायचे तर, त्यातच उन्मलीत होऊन नवीन काव्य वैभवी सौंदर्यशिल सृष्टीची निर्मिती करेल, ते अगम्य भोक्तेपण आस्वादिल. चिद्विलास हा चित्ताचा केवळ मनोरंजनाक खेळ किंवा लिला किंवा करमणूक नसून अनाकलनीय असले तरी प्रकटीकरणाचे प्रभावी कृतीदर्शन आहे.

श्रेष्ठतेचा असा पल्ला गाठण्याकरता मराठी भाषा संपन्न आहे का हा प्रश्न उद्भवणे साहजिकच आहे. आज तरी ते दिसत नाही. पण नाही म्हणून होणार नाही असे नाही. अमृताच्या पैजा जिंकणारी मराठी त्याच्याकरता तयार होऊ शकते. त्यातच तिची पूर्तता आहे. अपेक्षा आहे की त्याकरिता लागणारी वागतपश्चर्या केली जाईल .

अधिष्ठात्याने आपल्या क्रियावाण धर्मिणीला पाचारण करून येथे मृत्युलोकी दिव्यत्वाचा बहुगुणी होण्याकरिता तर हे सर्व प्रयोजन मांडले आहे. विस्तारित परिमाणांमध्ये सर्जनशीलता अनंताचे अनंत पैलू पाहील, अजून विकसित करील. तेच त्याचे बहुगुणत्व. ते आणणारे काव्य मग होते त्याची स्तुतीगाथा. तिथे वाढतो आश्चर्यकारक अभिनव आनंदविलास.

१७ नोव्हेंबर २०२५

3 responses to “Tomorrow’s Poetry — An Experiment in Marathi”

  1. RY Deshpande Avatar
    RY Deshpande

    ता. क. : पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.

    Like

  2. vibha10 Avatar
    vibha10

    अरवायडी सर!
    🙏 🕉️👌
    आपले कौतुक करावे तितके कमीच! मराठीतही आपण उत्कृष्ट काव्यकल्पना मांडून दाखवली आहे. ही आपली कविता उंच आकाशात म्हणण्यापेक्षा अंतरिक्षात घेऊन जाते.

    चिद्विलासाचे रहस्य माऊली श्रीज्ञानेश्वरांनी आपल्या रचनांमध्ये, विशेषेकरून ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांच्यात मांडलेले आहे.
    चिद्विलासवाद मांडण्यापेक्षा … म्हणण्यापेक्षा चिद्विलासच प्रत्यक्ष प्रकट करण्याकरता व त्याचा रसास्वाद घेण्याकरता सातशे वर्षांपूर्वीची जुनी मराठी सुसंपन्न होतीच! तशीच ती आजही सुसंपन्न होईलच … असेलच! पण माऊलीचे बोल ते माऊलीचे बोल! त्यांची सर कोणाला येणार आहे?

    आपण चिद्विलासावरील आपल्या उदात्त विचारांचे अनुभूतिपूर्ण शब्दात प्रकटन आणि मंडण केले आहे. त्यासाठी आपले शतशः अभिनंदन आणि आपल्या पेन मधून अशीच उत्कृष्ट विचारधारा उदात्तरित्या प्रकट होईल अशी आशा करतो. ती अशीच होत राहावी आणि राहीलच असे म्हणण्यापेक्षा … अपेक्षा करतो ….. तशी करू शकलो तर! … असे म्हणण्यापेक्षा अन्य काय म्हणू, ते म्हणतो.

    आपल्या ऋषितुल्य पादपंकजांचे स्मरण व त्यांना नमन करतो …

    ”जीवेत् शरदः शतात्”

    आपली विचारसरणी नेहमीप्रमाणेच अनुभूतीपूर्ण, उदात्त आणि स्पृहणीय आहे.
    🙏👌
    • प्रकरण पहिले: शिवशक्तिसमावेशन
    १- “यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् । श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥”

    २- “गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्याहि शांकरी । जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥”

    ३- “सार्द्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः । ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतच्छलान्मुहुः ॥”

    ४- “अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयंतौ मिथस्तराम् । तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥”

    ५-मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये ।
    क्षिणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥ ५ ॥

    अधिक माहिती:
    • ‘अमृतानुभव’ हा ज्ञानेश्वरांनी १३ व्या शतकात लिहिलेला एक स्वतंत्र आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे.
    • या ग्रंथात एकूण १० प्रकरणे आणि ८०६ ओव्या आहेत.
    • हा ग्रंथ ‘चिद्‌विलासानंद’ या नावानेही ओळखला जातो.
    • आपला
    • विभाकर लेले

    https://www.santsahitya.in/dnyaneshwar/amrutanubhav/

    Liked by 2 people

    1. RY Deshpande Avatar
      RY Deshpande

      अनेक धन्यवाद. आपल्याला खूप पुढे जायचे आहे. बघावे कसे आणी कुठपर्यंत ते जमते ते.

      Like

Leave a comment