पंचामृत — Panchāmṛta — The Nectar of the Gods

पंचामृत — Panchāmṛta — The Nectar of the Gods

By

/

6–8 minutes

read

थोडेसे आधीचे

काही महिन्यापूर्वी अचानक सुरवात झाली मराठीतून लिहिण्याची ह्या दोन ओळीपासून:

देव आला देवाच्या घरी
उभारली नवी पंढरी ।

बरेच दिवस त्या मनात सारख्या रेंगाळत राहिल्या. पण पुढे काही होत नव्हते. नंतर मात्र त्यांना घेऊन एकदम पहिली कविता साकारली गेली, एका झटक्यात. हे घडले २९ जानेवारी २०२५ला. आणि चमत्कार असा की, तेंव्हापासून मराठीतून काव्यलेखनास वेगाने जोर येऊ लागला. त्यापूर्वी मराठीतून काही म्हणजे काहीही लिहिले नव्हते. सर्व लिखाण इंग्रजीतून, अगदी सहजपणे. आधी विचार यायचे त्या भाषेत त्यामुळे हे नुसते मराठीकारण तर नव्हे ना असेही वाटू लागले. तरी देखील त्यातला मराठीचाच भाव अमूल्य आणि नाविन्यपूर्ण असल्याचे उमजू लागले. चार चौघा जाणत्यांना त्या पाठविल्या आणि प्रोत्साहक प्रतिसाद मिळाला. त्या धडाक्यात. २९ जानेवारी २०२५ ते ३ एप्रिल २०२५च्या काळात पंचवीसचा आकडा आला. वाटले हा छोटासा प्रयोग प्रसिद्ध करून तो कुठपर्यंत स्वीकाराह्य आहे ते पहावे. तसा मसुदाही तयार झाला, आनंदाचा सोहळा ह्या शीर्षकाखाली. इथे तो “दूध” ह्या सदरामधे आलेला आहे. सगळी भूमिका त्यात आहेच.

पण जेंव्हा छापायच्या दृष्टीने पुढे जायचे ठरविले तेंव्हा न संपणारा ओघ तसे करण्यास जाऊ देईना. सगळेच बदलले. ह्यात खूप दिवसापूर्वी इंग्रजी-संस्कृत रचनांचीही भर पडली. सर्व ठिकाणी अंतर्भाव आहे तो शेवटच्या अद्भुत खार ह्या कवितेतला :

शोधत उद्याचे रहस्य आली ह्या फांदीवर,
काय दिसे, सोनेरी प्रकाश अंधाऱ्या जगात;
तर जागृत आत्मा तिचा पाहे येणारे विश्व,
बघा, त्याच्या सन्मानार्थ कशी झाली उत्सुक;
आनंदाच्या पेरणीतून फोफावे आनंद आनंद,
आनंदाचे शेत, त्याचे सिंचन करी आनंदच.
१० जुलै २०२५

तुकारामाच्या “आनंदाचे डोही”त जेव्हढी उत्स्फ़ुर्तता आहे, जेवढी सहजता आहे, जेवढा सरळपणा आहे तेवढा ह्या आनंदाच्या पेरणीत निश्चितच नाही; हिच्यात एक प्रकारचे वेगळे आधुनिकत्व आहे, वेगळा वैचारिक तसेच गूढत्वाचा भाव आहे. आजकालच्या मराठी काव्यात तो आढळत नाही असे म्हटले तरी ते अवावगे ठरणार नाही.

बाह्यरूपाकडून आपल्याला अंतःप्रज्ञेकडे-कल्पनाशीलतेकडे जाऊन नवे शोध प्रयोगशील करावयास हवे, अमलात आणावयास हवे. अतिवास्तविक काव्य, कल्पनावादी-प्रतिकात्मक काव्य, त्याच्याच शोधात आहेत. परंतु ते चेतनेच्या-सर्वज्ञतेच्या शांततेतून उद्भवणाऱ्या जाणीवेच्या सर्वोच्च पातळीतून आले पाहिजे. उच्च धारणा, उच्च सूर, उच्च मधुर लय, उच्च कल्पना, अभिजातपणा, श्रेष्ठता, हे सर्व भविष्यकालीन काव्य भविष्याचा आविष्कार करणारे ठरले पाहिजेत.

ह्या सद्य संकलनाची ओढ तिकडची आहे. त्यात कुठपर्यंत काही साधले गेले हेही तेव्हडे महत्वाचे ठरत नाही, ओढ महत्वाची, प्रयास मोलाचा. पण हा एक प्रयत्न म्हणून बघण्यास काहीच हरकत नसावी. जर तो क्षण आला असेल तर त्याचे स्वागत करून कार्यशील होण्याची तयारी असणे ह्यातच सर्व समर्थन आलेले आहे. गूढ आणि आंतरमानसिक प्रेरणा प्रबळ होऊन नवी दालने उघडतील ह्यात अजिबात शंका नाही. ती उघडली गेलीच पाहीजेत.

श्री अरविंदांच्या एका इंग्रजी कवितेचे उदाहरण येथे पाहणे योग्य ठरेल. तिचे शीर्षक आहे Rose of God, ईश्वराचा गुलाब, पाच कडव्यात. त्याचे शेवटचे कडवे असे :

Rose of God, like a blush of rapture on Eternity’s face,
Rose of Love, ruby depth of all being, fire-passion of Grace!     
Arise from the heart of the yearning that sobs in Nature’s abyss:
Make earth the home of the Wonderful and life beatitude’s kiss.

https://incarnateword.in/sabcl/5/rose-of-god
https://www.youtube.com/watch?v=–VHq9IZ25w&t=72s

हे ईश्वराच्या गुलाबा, तू अनंतकाळाच्या चेहऱ्यावर लालीसारखा हर्षच,
हे प्रेमाच्या गुलाबा, माणिक-खोली सर्व अस्तित्वाची, कृपेची अग्नि-उत्कटता!
उठ, तळमळीच्या ह्रदयातून उठ, देत आहे जी हुंदके निसर्गाच्या विवरात,
होऊ दे, कर, पृथ्वीला अद्भुताचे निलय, दे जीवनाला परमानंदाचे चुंबन.

गूढ आणि गहन कवितेत विशिष्ट प्रकारच्या दार्शनिक आणि आंतरीक भावना असतात, केवळ कल्पनाशक्ती किंवा विचार नसून गोष्टी सूचकपणाने प्रतिकात्मक भाषेत सांगितल्या जातात. त्यातून निरनिराळे पैलू, निरनिराळ्या अर्थछटा उद्भवून उजळतात. अनाकलनीय विषय हाताळून ती एका अद्वितीय प्रकारच्या प्रत्यय अथवा अनुभूती संवेदना घेऊन येते. त्यात तिचे यश आहे.

ह्यापंचामृत संग्रहातील भाव, त्याचा रस, त्याची चव, त्याचा स्वाद, सुगंध, त्याची शान, त्याचे आंतरध्वनी, त्याचे शांत सूक्ष्म आवाज ऐकून शांत वातावरणात त्यांचा आनंदोत्सव साजरा होईल अशीच अपेक्षा बाळगून तो आपणा चोखंदळांना सादर करीत आहे.

१५ जुलै २०२५

प्रस्तावना

‘आनंदाचा सोहळा’

*तरल आणि अंतर्वेधी कविता…*

योगी श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानाचे मर्मज्ञ अभ्यासक तसेच पॉंडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमाचे ज्येष्ठ साधक आर. वाय. देशपांडे यांच्या ‘आनंदाचा सोहळा’ या कवितासंग्रहातील कविता वाचताना खरोखरीच आनंद वाटला. सर्वसाधारणपणे मानवी जीवनात सुख आणि दु:ख या दोन भावनांमध्येच आनंद शोधाची प्रक्रिया साधली जाते; मात्र आनंद हा या दोन्ही भावनांच्या पलीकडे उभा असतो. ज्याला तो दिसतो तोच प्रतिभावंत त्याकडे धाव घेऊ शकतो. देशपांडे यांच्या प्रस्तुत संग्रहात ही त्यांची धाव स्पष्टपणे दिसते. संपूर्ण आयुष्य तत्त्वज्ञानाने मंडित असलेले देशपांडे मराठी कवितेसारखा ललित साहित्यप्रकार हाताळताना कुठेही अवजड होत नाहीत. त्या कवितेच्या शब्दांना पेलवतील, मानवतील अशाच आशयाने अवगुंठीत असणारे शब्द या कवितांच्या अंगोपांगी आहेत. एकूण पंचवीस कवितांचा हा संग्रह सृष्टी, मानवी जीवन, मानवेतर अवकाश यासंबंधी भाष्य करताना दिसतो.

योगी श्रीअरविंदांनीच असे म्हटले आहे की, “काव्याची साद ही आपल्या ‘पलीकडून’, वैयक्तिक बुद्धीच्या आटोक्याबाहेरील जगातून आलेली असते. ती आत्म्याचीच साद असते. कवी आत्मरूप होऊन त्याच्या दिव्य प्रकाशात आनंदमग्न अवस्थेत वस्तूंच्या मुळाशी जाऊन  व्यापक सत्याचे दर्शन घेतो. त्याच्या काव्यभाषेतील शब्द क्रांतिकारक, झपाटून टाकणारा, अंत:स्फूर्त, प्रसादपूर्ण, सुक्ष्म-तरल, आनंदगर्भ व प्रकाशगर्भ रूप घेतो. या दृष्टीने ‘मंत्रकाव्य म्हणजे अतिशय उत्कट व आशयगर्भ असा लयबद्ध शब्द होय’. भावी कवीची अंतिम भाषा मंत्र हीच राहाणार. आज माणूस बुद्धिवादाकडून अंत:प्रज्ञेकडे वळू लागला आहे; त्यामुळे युरोपमधील भावी काव्यही पूर्णपणे अंत:स्फूर्त होणार व त्यातून मानवी मनाची संवादपूर्ण व प्रकाशगर्भ समग्रता व्यक्त होणार…” या श्रीअरविंदांच्या काव्याबद्दलच्या कथनाचा विचार करून जर आपण देशपांडे यांचा ‘आनंदाचा सोहळा’ हा संग्रह वाचायला गेलो तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो.

स्वत: आर. वाय. देशपांडे हे गेली अनेक दशके  पाँडिचरी येथे वास्तव्यास असून त्यांचा समग्र जीवनव्यवहार हा आता इंग्रजी भाषेत आहे. ते मूळचे मराठवाड्यातील आणि मराठी आहेत. त्यामुळे त्यांचे बालपण आणि पुढे पौगंडावस्था काळ संत साहित्य  साधनेत व्यतीत झाला आहॆ. पुढे विज्ञान शाखेचे शिक्षण आणि उच्च संशोधन यांत ते एकरूप झाले. मराठी भाषेशी तसा संबंध राहिलेला नव्हता. तरीही प्रस्तुत संग्रहातील सगळ्या कविता या मराठी भाषेतच मूलत: अवतरल्या आहेत. असे होण्याचे कारण काय? असा सहज प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर महायोगी श्रीअरविंदांच्या वरील काव्यविषयक परिच्छेदाच्या वाचनातून सहज मिळते. “काव्य हे आत्म्याचेच सर्जन असते आणि ते आपल्या पलीकडून, वैयक्तिक बुद्धीच्या आटोक्याबाहेरील जगातून येते.” याचे प्रतिबिंब म्हणजेच ‘आनंदाचा सोहळा’ या संग्रहातील कविता होय.

संत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, “अंतरीचे धावे। स्वभावे बाहेरी । आवरिता परि । आवरेना ॥” या ओवीचा अर्थ अभ्यासकाला जाणून घेणे सहज शक्य असले, तरी या ओवीतील भाव समजून घ्यायचा असेल तर देशपांडे यांच्या कविता वाचल्या पाहिजेत. याचे कारण असे की, मनात अनेक वर्षे साचून असलेली भावना हळूहळू पक्व होत जाते आणि मग तिचे कलात्मक अवतरण घडते. देशपांडे यांच्या बाबतीत त्या कलात्मक अवतरणाचे नाव ‘कविता’ असे आहे. त्यामुळेच त्या वाचताना वाचकाच्या मनात अर्थ उतरत जातो असे म्हणण्यापेक्षा भाव उतरत जातो असे म्हणणे जास्त सयुक्तिक आहे.

सृष्टी आणि मनुष्य हे दोन वेगळे नाहीत. जे सृष्टीत आहे तेच मानवात आणि जे मानवात आहे तेच सृष्टीत. यालाच आपण ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ असे म्हणतो. देशपांडे यांची कविता वाचत असताना याचा अन्वयार्थ उलगडतो. ‘येई शुभांगी’ या कवितेत ते म्हणतात,

*अणुरेणूत तीच प्रतिष्ठा, तोच थोरलेपणा*
*प्रफुल्लित जशी असे ही हसतमुख प्रेरणा*

*सप्तगंगेच्या काठी बसली महापंगत*
*आवडीचेच पक्वान्न सुगंधी केशरभात*

*दीप्तिवन्त वरुण, इंद्र, अग्नि सवितृ भग मित्र*
*प्रसन्नतेचा ध्वनी घुमे नवगायत्रीचा सर्वत्र*  

वरील कवितेच्या ओळींमधून एक अतिशय समृद्ध आणि व्यापक आशय देशपांडे व्यक्त करतात. ही सृष्टी भव्य, दिव्य आणि उदात्त अशा तीन शब्दांनी व्यापलेली आहे. मानवी जीवनाची तिच्या या व्यापकतेशी सांगड घालताना कवीची अथवा लिहिणार्‍याची दमछाक होऊ शकते; पण देशपांडे मात्र हे संमीलन सहज घडवून आणतात. याचे कारण त्यांनी महायोगी श्रीअरविंदांचे तत्त्वज्ञान फक्त वाचून बुद्धीच्या कक्षेत बंद केलेले नाही तर ते प्रत्यक्षात जगून दाखवले आहे. माणूस जे जगतो त्याचेच बिंब त्याच्या कलात्मक आविष्कारामध्ये दिसत असते. हा युगानुयुगांचा सिद्धांत आहे. प्रस्तुत कवितेच्या बाबतीतही त्याचा ठायी ठायी प्रत्यय येतो.

२९ जानेवारी २०२५ ते ३ एप्रील २०२५ या अतिशय छोट्या कालावधीतील या कविता आहेत. त्यामुळे एखाद्या अज्ञात शक्तीने त्या सलगपणे त्यांच्याकडून लिहून घेतल्या आहेत की काय, असाही प्रश्न येथे पडतो. भारतीय साहित्यशास्त्रात काव्यविषयक विवेचन खुप विस्ताराने झालेले आहे. त्यामध्ये विशिष्ट कालावधीत झालेल्या रचनांना प्रज्ञा-प्रतिभा यांच्या तराजूत तोलताना विशिष्ट भावसंयोजनाची मीमांसा केलेली आढळते. त्याचा आनंद या समग्र कविता वाचताना वाचकाला मिळतो.

काळ बदलत गेला की त्यानुसार वास्तवाचे रूप-संदर्भही बदलत जातात. कधी ते कवितासारख्या कलात्मक घाटात येतात किंवा येतही नाहीत. प्रत्येक कवीची आणि त्याच्या कवितेची स्वतंत्र परिभाषा आणि भूमिका असते. तो त्या परिभाषा-भूमिकेशी जर प्रामाणिक राहिला, तर ती कविता अधिकाधिक तरल आणि अंतर्वेधी होत जाते. अशा मार्गावर आर. वाय. देशपांडे यांचा हा संग्रह जाताना दिसतो.

— स्वानंद बेदरकर
नाशिक (महाराष्ट्र)

[श्री. स्वानंद बेदरकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, संपादक आणि वक्ते आहेत.]

Published in measureless gratitude to Sri Aurobindo, on the occasion of his Birthday, 15 August, and the Mother.

Leave a comment