Celebration of Ananda
आनंदाचा सोहळा
आनंदाचा प्रासाद आनंदाच्या पायऱ्या
आनंदाचे पंख आनंदाच्याच भराऱ्या ।
उंच उंच चढे शुभ्र आनंदाचे शिखर
धवलगिरीचे आनंदी पुण्य भूतलावर ।
आनंदाच्या वस्तीत आनंदाचा सोहळा
उत्तुंग आनंद सर्वत्र सोन्याहून पिवळा ।
उसळे अथांग महासागर आनंदाने
वाढवीत लेवीत पर्वणीचे शुभ लेणे ।
आनंदाचे अलंकार आनंदाची ख्याती
गगन तोकडे म्हणून पृथ्वीची महती ।
आनंदाची प्रतिष्ठा यज्ञयाग रात्रंदिन
आनंदात अग्नितेजाचे उगम स्थान ।
आनंद-अग्नि अमृतदेह ठरवे
साहसी आनंद दिव्य जीवन घडवे ।
15 March 2025
आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥
काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥
संत तुकाराम

Leave a comment